पावसाळ्यात होणाऱ्या सांध्यांच्या विकारांवर काय आयुर्वेदिक उपचार आहेत..?

पावसाळ्यात होणाऱ्या सांध्यांच्या विकारांवर काय आयुर्वेदिक उपचार आहेत..?

सामान्यतः वाढत्या वयानुसार सांधेदुखीचा त्रास होतो. हल्ली हा joint pain चा त्रास फक्त जेष्ठांनाच नाही तर तरुणांना देखील होताना दिसतो. चालताना, उठताना, बसताना, काम करताना, वाकताना सांध्यांमध्ये त्रास जाणवतो. पावसाळ्यात हा त्रास अधिक होण्याचा संभव असतो. पावसाळ्याच्या या ढगाळ वातावरणात तो प्रकर्षाने जाणवतो. बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. धावपळीचे जीवन, ताणतणाव यामुळे आपल्याला व्यायाम करण्यासाठी पुरेसा वेळ देखील मिळत नाही त्यामुळे ऋतू परिवर्तनाचा किंवा ऋतुसंधीचा त्रास व परिणाम आपल्याला दिसून येतो आणि याचाच तीव्र स्वरूपाचा परिणाम पावसाळ्यात सांध्यांवर परावर्तित होतो.

चुकीच्या व अनियमित आहार सेवनाच्या पद्धती व त्यामुळे पचनक्रिया बिघाड व उदभवणारा आम्लविपाक यामुळे सांध्यांचे दुखणे पावसाळ्यात वाढते. पावसाळ्यातील आभाळ भरून येणे यांमुळे सांध्यांमध्ये वेदना जाणवू लागतात. बोचरे वारे व त्यामुळे उत्पन्न होणारी ठणक ही लक्षणे प्रकर्षाने जाणवतात तसेच सांधे सुद्धा आखडतात.

सांध्यांमध्ये सूज येणे हे लक्षण तर नित्याचेच होऊन बसते. सदरील लक्षणांपासून सुटका होण्यासाठी नाडीपरीक्षणावर आधारित आयुर्वेदीय चिकित्सा पद्धती अत्यंत उपयोगी ठरते असे अनुभवास आले आहे.

वजन उचलताना, पायऱ्या चढताना आणि कालांतराने चालताना देखील त्रास होतो. मग मांडी घालून बसताना व भारतीय पद्धतीच्या टॉयलेट मध्ये बसताना पावसाळयात अधिक वेदना होतात. ऑस्टियोआर्थराइटिसमुळे सांध्यांमध्ये सूज येते. सांध्यांमध्ये कडकपणा आल्याने तेथील लवचिकता कमी होते व मोड कमी होतो एरवी मांडी आणि पोटरी एकमेकांना स्पर्श करू शकतात मात्र सूज आल्याने व सांध्यांची झीज झाल्याने कडकपणा येतो तसेच पावसाळ्यात हे प्रकर्षाने जाणवते.

आपल्या शरीराच्या हालचालींसाठी, मॅस्क्युलोस्केलेटल सिस्टिम म्हणजेच हाडे आणि स्नायूंना एकत्रित कार्य करण्याची प्रणाली कारणीभूत ठरते. हाडे शरीराला आकार देतात आणि स्नायू हे एखाद्या मोटार सारखे कार्य करून त्या हाडांना गती मिळवून देतात, त्यामुळे कार्य सुरळीत करू शकतो. हाडांची हालचाल होताना घर्षण होणे क्रम प्राप्त ठरते अशा वेळी आयुर्वेदीय चिकित्सा पद्धतीने त्यातील वंगण व्यवस्थित ठेऊन पावसाळ्यातील सांध्यांच्या तीव्रता कमी करता येते

वर्षा ऋतुमध्ये वायुचा (वाताचा) प्रकोप होत असतो; तसेच पित्ताचा संचय होत असतो. पावसाळ्यात वातावरणातील बदलांमुळे स्वभावतःच जठराग्नि मंद असतो. ज्यामुळे मानवांची पाचक क्षमता मंदावते व परिणामतः अजीर्ण, आमाजीर्ण, वातदोष सर्दी, अतिसार तसेच आमवात, संधिवात असे सांध्यांचे दुखणे प्रकर्षाने डोके वर काढते.

मुळातच पावसाळ्यात वायुचा (वाताचा ) प्रकोप जास्त होतो. तसेच पित्ताचा सांध्यामधील संचयाने वेदना सांध्यामध्ये जाणवायला लागतात. निसर्गतःच होणाऱ्या या सर्व क्रियांद्वारे पावसाळ्यात सांध्यांचे दुखणे , वाताचे विकार, संधिवात बळावतात. त्यामुळे या काळात त्यांच्यावर विशेषत्वाने लक्ष देणे गरजेचे ठरते, अन्यथा जुनाट संधीविकार बळावण्याची दाट शक्यता असते. पावसाळ्यातील सांध्यांच्या दुखण्यापासून दुर राहण्यासाठी आयुर्वेदानुसार लघु आहाराचे विलक्षण महत्व आढळुन येते. तसेच या काळात अग्निवर्धक, दिपक, पाचक आयुर्वेदीय औषधांचा वैद्यांच्या सल्ल्याने घेणे आपणास उपयुक्त ठरते.

पावसाळ्यात वात दोषाची वृद्धी स्वभावतःच होत असल्याने त्यांना शांत करण्यास मधुर, अम्ल व लवण रसयुक्त, हलके व लवकर पचणारे व वातशामक पदार्थांचे सेवन उपयुक्त ठरते.

या काळात फळभाज्यांचे सेवन मेथी, पालक, सुंठ, ओवा, भाकरी, साळीचे तांदुळ यापासुन तयार केलेले अन्न पदार्थांचे सेवन करणे अतिशय फायद्याचे ठरते.

या काळात पचन शक्ती अतिशय मंदावलेली असते त्यामुळे लंघन करणे अर्थात उपवास करणे देखील आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरते, त्यामुळे वाताचा प्रकोप होत नाही व परिणामी संधिवात / आमवात इ. सांध्यांचे आजार वाढण्याचा संभव कमी होतो. तसेच या काळात द्राक्षे , अंजीर, सफरचंद , डाळिंब, जांभुळ इ. फळाचे सेवन करणे फायद्याचे ठरते.

पावसाळ्यातील संधिविकार व घरगुती आयुर्वेदीय उपचार

पावसाळ्यामध्ये सांध्यांच्या दुखण्याला जर दूर ठेवायचे असेल तर अतिशय संयमाने आहार, विहार यांचा आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे अनुसरण करणे गरजेचे ठरते त्यांचा क्रमवार विचार करू.

  • या काळात वाताचा प्रकोप झाल्या कारणाने सांधेदुखी वाढते त्यामुळे नियमित हलका नैसर्गिक व्यायाम करणे गरजेचे ठरते. यात योगासनांची भूमिका अतिशय महत्वाची ठरते. यात योगासनांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते. प्रत्येकाने नियमितपणे सूक्ष्म व्यायाम, हलके व्यायाम व योगासने करणे गरजेचे आहे.
  • आपल्या शरीराचे वजन सांध्यांवर पडते व त्यामुळे सांधेदुखी सुरु होते त्यामुळे वजन नियंत्रणात असणे फायद्याचे ठरते. प्रत्येकाने वजन नियंत्रणातच ठेवावे.
  • प्रत्येकाने संतुलित आहार सेवनात ठेवावा त्यामुळे शरीराला आवश्यक असणारे प्रथिने, कर्बोदके, उर्जधारक शरीराला मुबलक मिळतात या साठी वैद्यांच्या सल्ल्याने आहार संतुलित ठेवावा
  • ड जीवनसत्व्व हाडांसाठी उत्तम असते त्यासाठी कोवळी प्रकाश किरणे त्वचेवर पडणे गरजेचे असते त्याचा प्रत्येकाने विचार करावा
  • सांध्यांना तेलाने (तीळ तेल) मालिश केल्यास सांध्यामधील वंगणाची पातळी नियमित राहते व हाडांमधील घर्षण व त्यामुळे होणारी झीज कमी होते
  • कडधान्ये, फळभाज्या (पडवळ, दुधीभोपळा, लालभोपळा, भेंडी नवलकोल, श्रावण घेवडा, शिमला मिरची, कारले) इ . सेवनात नियमित ठेवावेत.
  • OMEGA युक्त पदार्थ जसे अक्रोड , बदाम , सुकामेवा यांचे सेवन करावे .
  • पावसाळ्यातील सांध्यांच्या दुखण्यावर आले अत्यंत उपयुक्त ठरते . आल्यामधील जिंजेरॉल सांध्यांचे दुखणे कमी करते त्यामुळे ते दैनंदिन सेवनात ठेवावे ,
  • दर दिवशी गरम पाण्याच्या पिशवीने सांधे शेकल्यास सांध्यांचे दुखणे दुर पळते ,तसेच सांध्यांना गरम पाण्याच्या धारेखाली धरल्यास आराम मिळतो .
  • २ चमचे बडीशेप + १/२ सुंठीचा तुकडा ४ कप पाण्यात टाकून १/२ कप शिल्लक राहिल्यात त्यात थोड्यावेळाने १ चमचा एरंड तैल टाकून सेवन केल्यास सांध्यामधील दुखणे उणावते
  • मेथीचे लाडू अथवा डिंकाचे लाडू याचे सेवन लाभदायी ठरते
  • वरील सर्व काळजी घेतल्यास पावसाळ्यातील सांधेदुखी कमी होण्यास मदत होते व जीवन आनंदाने जगता येते
  • परंतु या साठी नियमित आहार ,विहार योगासने , संतुलित जीवन घरगुती उपाय यांचा यथायोग्य पद्धतीने सांगड घालणे गरजेचे ठरते तसेच वैद्यांचा सल्ला घेणे क्रमप्राप्त ठरते