नाडीचिकित्सा थोतांड आहे का? – डॉ. विश्वास घाटगे (आयुर्वेदाचार्य)

नाडीचिकित्सा थोतांड आहे का? – डॉ. विश्वास घाटगे (आयुर्वेदाचार्य)

सध्या  आयुर्वेद कि Allopathy कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ यावरील वादविवाद, चर्चा होताना आढळत आहेत. सध्या कोणते  शास्त्र श्रेष्ठ की कनिष्ठ ते ठरवण्यापेक्षा आपण सर्वांनीच  मिळून रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा ह्या सद्भभावनेने काम करणे गरजेचे आहे.

आयुर्वेदाविषयी कोणतेही मत बनवताना त्याविषयीची तथ्ये आपण जाणून घेणे गरजेचे आहे. आयुर्वेद म्हटलं की केवळ काढे ,चूर्ण, भस्म एवढाच विचार कदाचित आपल्या मनात येतो. क्वचित काही व्यक्ती ती नाडी परीक्षा म्हणजे भूलथापा किंवा थोतांड आहे असे मत जाहीरपणे करतानाही आढळतात. या त्यांच्या मतावर आक्षेप घेण्यापेक्षा खरंच आयुर्वेद म्हणजे काय? आणि नाडीपरीक्षा खरी असते का? शास्त्रामधे त्याविषयी काय उल्लेख आहे? या नाडीपरीक्षेचा दुर्धर, किचकट आजारांचे निदान आणि चिकित्सा योजना करण्यासाठी कसा उपयोग होऊ शकतो हे जाणून घेणे गरजेचे आहे.  

सर्वप्रथम आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे, काहींच्या मते भारतीय संस्कृतीमधील वर्णित पाचवा वेद आहे. आयुर्वेद प्राचीनतम शास्त्र असून याची उत्पत्ती  इ. स पूर्व ३००० ते ५००० वर्ष पूर्वी असू शकते असे संदर्भ आढळतात. आयुर्वेद ह्या शब्दाचा संधीविग्रह केल्यास आयुषः वेदः आयुर्वेद असा आढळतो, याचा अर्थ ठरतो आयुष्याचे शास्त्र / वेद अर्थात Science of Life.

आयुर्वेदामधे सर्वप्रथम निरोगी व्यक्तीची व्याख्या संकल्पना वर्णन केलेली आहे आणि याच जोडीला निरोगी व्यक्तीने व्याधीमुक्त जीवन जगण्यासाठी उपयुक्त हितकर, अहितकर आहार, विहार, दिनचर्या, ऋतुचर्या यांचे वर्णन आढळते. सर्वसामान्य मनुष्य आयुष्य जगत असताना शरीरातील वात, पित्त, कफ या दोषांची  स्तिथी  बदलल्याने व्याधींची निर्मिती होते. आता आयुर्वेदामधे केवळ व्याधी आणि त्यांची चिकित्सा एवढाच विचार केलेला नाही तर आयुर्वेदाची स्वतःची निदान पद्धती किंवा Diagnostic process आहे. ज्या अंतर्गत वैद्य अष्टविध परीक्षेद्वारे आजाराचे निदान करु शकतो. अष्टविध परीक्षांमध्ये शब्द, स्पर्श, दृक्, आकृती, मल, मूत्र, जिव्हा आणि नाडी यांचा अंतर्भाव होतो. 

तर मग थोडंसं आजच्या विषयाच्या अनुषंगाने नाडीपरीक्षेविषयी जाणून घेऊया. सर्वप्रथम नाडी अर्थात pulse आपल्या रक्तवाहिनीचे जाणवणारे ठोके जे साक्षात जीवनाचे लक्षण आहे. नाडीची/रक्तवाहिन्यांची स्पंदने शरीरावर जवळजवळ ९ ठिकाणी स्पष्ट जाणवतात. नाडीपरीक्षा करताना केवळ नाडीचे ठोके मोजले जात नाहीत किंवा नुसतीच स्पंदने पाहिली जात नाहीत तर नाडीची गती, लयबद्धता स्पंदनांचे विशिष्ट क्रम यांचे आकलन हाताच्या तर्जनी, मध्यमा, अनामिका या बोटांमार्फत जाणून घेतले जातात. मनगटाजवळ ‘रेडियल आर्टरी’च्या रक्तवाहिनीने स्पंदने, नाडीपरीक्षेच्या विशिष्ट गती आणि लयबद्धतेनुसार शरीरातील त्रिदोषांची स्थिती तसेच शरीरातील धातूंवरील  परिणाम समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरते .नाडीपरीक्षा केवळ शारीरिक नाही तर मानसिक स्थितीचे ज्ञान करून देते. नाडीपरीक्षेचे अनेक पैलू आहेत सर्वसाधारण प्रचलित पद्धतीनुसार पुरुषांच्या उजव्या हाताची आणि स्त्रियांच्या डाव्या हाताची नाडीपरीक्षा केली जाते. काहींच्या मते उजव्या हाताची नाडी शरीरातील दोषस्थिती दर्शवते तर डाव्या हाताची नाडी धातुंची स्थिति दर्शवते. 

नाडीपरीक्षा करून आजाराची लक्षणे एवढेच मर्यादित ज्ञान न घेता त्यामागील कारणेही समजुन येतात. नाडीपरीक्षेचा सखोल अभ्यास केवळ अनुभवानुसार येतो. असा अभ्यास असेल तर वैद्य रुग्णाला कोणताही प्रश्न न विचारता केवळ नाडी पाहुन आजार, आजाराची कारणे, लक्षणे, सहजरित्या जाणुन घेऊ शकतो आणि त्यानुसार दिलेली चिकित्सा निश्चित फलदायी ठरते. कारण या ठिकाणी केवळ लक्षणांना जाणून त्यानुसार उपचार केले जात नाहीत तर लक्षणांमागील मुळ कारणे नाडीपरीक्षेद्वारे जाणून उपचार केले जातात. आपल्याला होणारे आजार, विकार यांचा संबंध आपला आहार, विहार, जीवनपद्धती, पुर्वी झालेल्या आजारांचा शरीरावरील होणारा परिणाम ह्यांच्याशी निगडित आहे. आणि नेमका हाच बदल नाडीपरीक्षेद्वारे समजुन येतो. 

आज आपण २१ व्या शतकामधे वावरताना नवनवीन व्याधी, जीवाणु, विषाणु संसर्गाचा सामना करतोय. ‘हायपो थॉयरॉईडिजम’, डायबेटीस, स्थौल्य, ह्र्दयविकारांसारख्या लाईफ स्टाईल डिसऑर्डर्सचे प्रमाण वाढताना दिसते. याच जोडीला संधिवात, आमवात, सांध्यांचे विकार तसेच सोरायसिस, एक्झिमा सारखे त्वचाविकार. वेगवेगळ्या ऍलर्जी, तसेच पित्ताचे व पोटाचे विकार वाढताना आढळतात.

या बाबतीत काही व्यक्तींमधे औषधांचा मर्यादित स्वरूपाचा फायदा होताना आढळतो. अशा रुग्णांसाठी नाडीपरीक्षा वरदान ठरू शकते. या आजारांचे मुळ कारण दुर झाल्याशिवाय हे आजार समुळ बरे होणार नाहीत. नेमके याच ठिकाणी नाडीपरीक्षेवर आधारित उपचार उपयोगी ठरतात. नाडीपरीक्षा केल्याने रुग्णाची प्रकृती समजते  शरीरातील दोषस्थिती समजते. ज्याच्या अनुषंगाने कोणते औषध किती मात्रेमधे घ्यायचे ते ठरवता येते आणि नेमक्या औषधांची निवड करता येते जी अर्थातच रुग्णाला सर्वप्रकारे बरे होण्यासाठी मदतीची ठरते.

नाडीपरीक्षा हे केवळ कोणताही अंदाज किंवा थोतांड मुळीच नाही. खरंतर  नाडीपरीक्षेमधे संपुर्ण आयुर्वेदाचे सार सामावलेले आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.  सर्व चिकित्सा सुत्रांचे मुळ नाडीपरीक्षेमधे आहे. मुळातच नाडीपरीक्षा हे आयुर्वेदातील स्वयंपुर्ण शास्त्र आहे. ज्याचा अभ्यास अधिकाधिक वैद्यांनी करून रुग्णसेवा करायला हवी. आपल्याला कदाचित माहिती नसेल परंतु नाडीपरीक्षेचे सखोल माहितीपुर्ण उल्लेख सर्वप्रथम रावणकृत संहितेमध्ये आढळतो.