नाडीचिकित्सेने सिद्ध झालेले हे आयुर्वेदिक उपाय करा आणि सततच्या सर्दीला गुडबाय म्हणा..!

आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये काही आजार आपल्या प्रत्येकाला होऊन गेलेले असतात. त्यापैकी एक आजार म्हणजे सर्दी आपल्या प्रत्येकाला कधी ना कधी सर्दी हा आजार होऊन गेला आहे. बऱ्याचदा औषधे न घेताही हा आजार कमी होताना आढळतो. परंतु आपल्यापैकी अनेक जण सततच्या सर्दीने त्रस्त असतात!!!

आज या रुग्णांविषयी आणि सततची सर्दी किंवा वारंवार सर्दी का होते, त्यामागे नेमके कारण कोणते? आयुर्वेदिक औषधोपचार तसेच विशेष नाडीचिकित्सा आपल्याला वारंवार होणारी सर्दी घालवण्यासाठी उपयुक्त कशी ठरते हे पाहूयात.

सर्वसाधारणतः हवेतून होणाऱ्या जंतूसंसर्गामुळे काही वेळा बदललेल्या ऋतुमानामुळे परिणामांबद्दल सर्दी होताना दिसून येते जी औषधे घेऊन पूर्णतः जाते. मात्र काही व्यक्तींमध्ये थोडा हवेतील ऋतूंमधील बदलांमुळे थंड पाणी, थंड वारा (पंखा, AC) संपर्काने, थंड पदार्थ खाल्ल्याने पटकन सर्दी होते. काही जण असेही असतात ज्यांना चिक्कू, केळी, सीताफळसारखी फळ खाल्ली की लगेच सर्दी होते, नाक चोंदते, कफ होतो, आवाज बदलतो, डोके जड वाटते. या व्यक्तींमध्ये मूळ प्रकृतीमध्ये बदल झाले असल्याने या कफकर पदार्थांच्या सेवनाने किंवा वातुळ आहार घेतला की या लक्षणांची निर्मिती होताना आढळते.

विशेषतः लहान मुलांमध्ये ही लक्षणे करणे अधिक आढळतात, ह्याचे कारण त्यांचे व्याधीक्षमत्व विकसित नसते आणि विशेषतः पचन संस्थेतील बदलांमुळे वारंवार कफ होण्याची प्रवृत्ती झालेली असते.

या व्यक्तींमध्ये केवळ सर्दी दूर करणारी औषधे न देता वारंवार सर्दीची लक्षणे निर्माण करणारी कारणे जसे की व्याधीक्षमत्व, पचनातील बदल, शरीरातील दोष स्थिती यांचा विचार करणे गरजेचे असते. या विशिष्ट बदलांना जाणून घेण्यासाठी आयुर्वेदिक निदान पद्धतींपैकी नाडीपरीक्षा विशेष उपयोगी ठरते. त्यांच्या प्रकृतीतील बदल, शरीरातील दोषस्थिती, पचनसंस्थेतील बदल, मलावष्टंभ या मूळ कारणांचा विचार करून उपचार दिल्यास ही वारंवार सर्दी होण्याची प्रवृत्ती कमी अथवा कायमची दूर होऊ शकते.

त्याच जोडीला सध्या बऱ्याच व्यक्तींना allergic सर्दीचा त्रास अधिक प्रमाणात होताना आढळतो. भारतीय हवामान, वातावरणातले चढउतार, वायू प्रदूषण, धुळ, धूर यांच्याशी संपर्क, अगदी थोडा वेळ पंख्या खाली किंवा AC मध्ये बसले तरी नाक वाहू लागणे, भरपूर शिंका येणे, नाक चोंदणे यांसारख्या तक्रारी अनेकांना होताना आढळतात.

काही व्यक्तींच्या बाबतीत तर अगदी घरी असताना दररोज सकाळी उठल्याउठल्या, अंघोळ केल्यांनतर, काही वेळेस संध्याकाळी विनाकारण शिंका येऊ लागतात, नाकातून अगदी पाण्याची धार लागते, डोळे खाजवतात, नाकाच्या शेंड्याला खाज येताना आढळते. काही वेळेस उग्रवास, उदबत्तीचा धुर, फोडणीचा उग्र वासाने देखील ही लक्षणे वाढताना आढळतात.

सर्वसाधारणतः या तक्रारींसाठी एलर्जीवरील औषधे दिली जातात. जी ताबडतोब उपयोगी पडतात मात्र जेव्हा त्यांचा शरीरावरील प्रभाव कमी होतो तेंव्हा लक्षणे पुन्हा उत्पन्न होऊ लागतात.

बराच काळ औषधे घेऊन देखील या एलर्जीक सर्दीच्या तक्रारी पूर्णतः जात नाहीत. या ठिकाणी एलर्जीकवरील औषधे ही ऍलर्जिक प्रतिक्रियेमध्ये निर्माण होणारे Histamine नावाचे विशिष्ट रसायनाचे उत्पादन कमी करते. मात्र औषधाचा परिणाम कमी झाला की पुन्हा त्या ऍलर्जिक प्रतिक्रिया उत्पन्न होतात आणि पुन्हा पहिल्यासारखी लक्षणे दिसून येतात.

आयुर्वेदिक औषधे ही ऍलर्जिक सर्दी दूर कशी करतात हे पाहु ?

आयुर्वेदानुसार शरीरामध्ये बदललेली दोषस्थिती या प्रतिक्रिया आणि लक्षणांना उत्पन्न करण्यासाठी कारणीभूत ठरतात. नाडीपरीक्षेच्या अनुषंगाने या आजारांच्या बाबतीत विचार केला तर विशेषतः शरीरामध्ये वाढलेला वात-कफ दोष ह्या कारणांना उत्पन्न करत असतो. शरीरातील वातवृद्धीमुळे शिंका येणे, नाकातुन पातळ पाणी वाहणे यांसारखी लक्षणे उत्पन्न होऊ शकतात. याठिकाणी आपण जाणुन घेतले पाहिजे की बाह्य वातावरण किंवा विशिष्ट पदार्थांशी संपर्क हे केवळ निमित्तमात्र कारण असते ज्यामुळे शरीरामध्ये ऍलर्जिक प्रतिक्रिया उत्पन्न होतात. मूळ कारण आहे ते या रुग्णांच्या शरीरामध्ये झालेले बदल अथवा बदललेली दोषस्थिती ज्याच्या परिणामस्वरूप या निमित्तमात्र कारणांनी ऍलर्जिक सर्दी होताना आढळते.

जर केवळ ऍलर्जिशी निगडित बिघाडांना दुर केले तर ते केवळ लाक्षणिक चिकित्सा ठरेल. अथवा केवळ लक्षणांना दुर करेल मात्र आजाराला किंवा या सर्दीमागील मूळ कारणांना दुर करणार नाही ज्यामुळे वारंवार सर्दी उत्पन्न होते.

नेमके हेच नाडीचिकित्सेमध्ये केले जाते ज्यामध्ये नाडीपरीक्षेमध्ये रुग्णाच्या शरीरातील दोषस्थितीचा विचार केला जातो. याच जोडीला रुग्णाची एकुण जीवनपद्धती, खाण्या-पिण्याच्या सवयी, पुर्वी झालेले आजार आणि त्यांचा शरीरावरील परिणाम, पचनसंस्था, मलावष्टंभ, झोपेच्या सवयी, रुग्ण कोणत्या ठिकाणी राहतो यांचा विचार करून या ऍलर्जिक सर्दीमागील मूळ कारण समजुन घेण्याचा प्रयत्न केला जातो. ही चिकित्सा आपली ऍलर्जिक सर्दी पुर्णतः बरी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आयुर्वेदिक औषधी शास्त्रातील सितोपलादी चुर्ण, लक्ष्मी विलास रस, महायोगराज गुग्गुळ, व्योषादी वटी, नाग गुटी यांसारखी औषधे आपल्याला सर्दीसाठी उपयुक्त ठरतात.

याच जोडीला घरगुती उपायांपैकी हळद चुर्ण मधासोबत घेतल्यास उपयोगी ठरते. सुंठ, चिमुटभर मिरी पावडर घेऊन मधासोबत चाटल्यास उपयुक्त ठरते. दररोज सकाळी अनशापोटी तुळशीचे पान चावुन खाल्यास आपली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी तसेच श्वसनसंस्था कार्यक्षम राहण्यासाठी उपयुक्त ठरते. कधी जर सर्दी आत साठुन राहिली असेल, नाक चोंदले असेल तर मिरी पावडर दह्यासोबत घेतल्यास उपयुक्त ठरते. ऍलर्जिक सर्दी वर पाहता किरकोळ लक्षणे जाणवत असली तरी अधिक काळ राहिल्यास श्वसनाचे आजार, दमा, Bronchitis सारखे आजार उत्पन्न करू शकते.